Menu Close

Mrudagandha

जसजसा एडलेड मधील मराठी मंडळींची संख्या वाढू लागली तसतसं नवीन कल्पना आणि विशेषतः सांस्कृतिक कार्यक्रम नियमित व्हायला लागले. इथे साहित्यासाठी एक व्यासपीठ हवं असा विचार काही मंडळींच्या मनात आला आणि त्यांनी अथक प्रयत्न करून, गणरायाला नमन करून २०१३ साली एडलेडमधील मराठी मंडळींना एक हक्काचं साहित्यिक व्यासपीठ म्हणून मृदंगन्ध ह्या नियतकालिकाचा पहिला अंक काढला. ह्या अंकांच्या संपादिका डॉ.प्रीतम गानू होत्या. नंतर काही कारणास्तव त्या कामात खंड पडला मात्र २०१८ मध्ये परत त्या प्रकल्पाने उचल खाल्ली आणि २०१८ साली दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर मृदगन्धाचा दिवाळी विशेषांक प्रकाशित झाला. त्यानंतर २०१९ गुढीपाडवा आणि २०१९ दिवाळी असे दोन विशेषांक प्रकाशित झाले आणि रसिकांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला. मृदगंधच्या संपादकपदाची धुरा आता श्री.अभिजित मोहोळकर ह्यांनी सांभाळली आहे.

हा उपक्रम रसिकांच्या पाठींब्याच्या आणि प्रेमाच्या जोरावर लौकरच बाळसे धरून, गुटगुटीत होऊन चांगला वाढीला लागेल असा विश्वास आहे.

शेवटी संस्कृती म्हणजे तरी काय?

शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी आणि वांग्याचे भरीत …
गणपती बाप्पा मोरयाची मुक्त आरोळी…
केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचे वरण. …
उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ…
मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी…
दुस-याचा पाय चुकून लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार…
दिव्या दिव्या दिपत्कार…
आजीने सांगितलेल्या भुताच्या गोष्टी…
मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेंव्हा लहानमोठी होणारी शेपटी…
दस-याला वाटायची आपट्याची पाने…
पंढरपुरचे धुळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफ़ुटाणे…..
सिंहगडावर भरुन आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मुठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श…..
कुंभाराच्या चाकावर फिरणा-या गोळ्याला, त्याचे पाण्याने भिजलेले नाजूक हात लागून घाटदार मडके घडावे तसा हया अदृश्य, पण भावनेने भिजलेल्या हातांनी हा पिंड घडत असतो.
कुणाला देशी मडक्याचा आकार येतो. कुणाला विदेशी कपबशीचा…

संस्कृती अशीच आपल्या रोजच्या जीवनाचा भाग असते आणि हा वसा आपल्या माय मराठी मातीचा आपण पुढच्या पिढीला द्यायचा..तोच आपल्या मनात दरवळणारा ओल्या मातीचा सुगंध म्हणजे हा मृद्गंध’ चा अंक!

हा अंक आपल्याला कसा वाटला, काय आवडलं,काय नाही आवडलं ते आम्हाला email अथवा facebook  द्वारे जरूर कळवा.या निमित्ताने आपण एक नवीन उपक्रम सुरु करत आहोत. भाषा, प्रदेश, व्यवसाय याच्या सर्व सीमारेषा पुसून अधिकाधिक लोकांपर्यंत आपली संस्कृती, आपली भाषा आणि प्रेम पोहोचावं हीच इच्छा!

मागील अंक

Gudhee Padwa 2021
Gudhee Padwa 2020 Diwali 2019
Gudhee Padwa 2019Mrudagandha Diwali 2013 edition
Mrudagandha edition May 2013 Mrudagandha edition Jan 2013