०१ ऑगस्ट दिनविशेष

जयंती:
मा. भगवान अर्थात भगवान आबाजी पालव (१९१३)

सिनेनिर्माते, दिग्दर्शक व अभिनेता: – एका गरीब गिरणी कामगाराच्या पोटी जन्माला आलेल्या भगवान दादांनी, अगदी तरुणपणीच चित्रपटांत प्रवेश केला आणि लौकरच मूकपटांत भगवान – बाबुराव ही जोडी अतिशय लोकप्रिय झाली. त्यांनी चित्र निर्मितीच्या अन्य अंगांचा अभ्यास करून स्वतः चित्रपट लिहिणं आणि दिगदर्शित करणं सुरू केलं. थोर संगीतकार सी.रामचंद्र ह्यांना पहिला स्वतंत्र चित्रपट भगवान दादांनीच मिळवून दिला. भगवानदादांनी बनवलेला अलबेला आजही लोकांच्या लक्षात आहे. आजही भगवानदादांच्या डान्सची चित्रपटात नक्कल केली जाते.

श्री. ज. जोशी (१९१५) लेखक: – श्रीकृष्ण जनार्दन जोशी अर्थात श्री.ज. जोशी गाजलेले कादंबरीकार होते. त्यांनी अनेक कादंबऱ्या, लघुकथा आणि निबंध लिहिले . आनंदी गोपाळ ही त्यांची पुरस्कार विजेती कादंबरी. त्यांनी रघुनाथाची बखर हे र.धों. कर्व्यांचे चरित्रही लिहिले

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (१९२०): – तुकाराम भाऊराव साठे हे अण्णाभाऊ साठे ह्या नावाने ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. साठे यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये फकिरा (१९५९)ही प्रचंड गाजलेली कादंबरी आहे. १९६१ मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार फकिरा ला मिळाला आहे. साठेंनी १५ लघु-कथा संग्रह लिहीले, ह्या कथा मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि २७ अ-भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त साठे यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, १२ पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील १० गाणी लिहिली.

पुण्यतिथी :
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (१९२०)

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी आणि धुरीण. महाराष्ट्रात शिवजयंती आणि गणेशोत्सवाला सामाजिक चळवळीचं रूप देण्यात ह्यांचा सिंहाचा वाटा होता. टिळकांनी केसरी व मराठा ह्या वर्तमानपत्रांद्वारे जन जागृती व इंग्रज सरकार विरुद्ध जनमत बनवण्याचे काम जोमाने चालवले होते. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच अशी गर्जना त्यांनी इंग्रजांनी त्याच्याविरूद्ध चालवलेल्या खटल्यात केली. इंग्रजांनी त्यांना मंडाले तुरुंगात पाठवले असता तिथे गीता रहस्य हा ग्रन्थ लिहिला.